Tiranga Times Maharastra
महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. अनेक ठिकाणी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे महापौरपदासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी मोठा धक्का देणारी माहिती समोर येत आहे.
चंद्रपूर महापालिकेत सध्या सत्तासमीकरण अडकलं असून येथे काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. काँग्रेस नगरसेवकांना विकासासाठी भाजपच सक्षम वाटत असल्यामुळे ते आमच्याशी संपर्कात आहेत, असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, शिवसेना उबाठा गटाच्या महापौर पदाच्या मागणीवरही त्यांनी ठाम भूमिका मांडली.
“शिवसेना उबाठाला कुठल्याही परिस्थितीत महापौरपद देणार नाही. वेळ पडली तर भाजप विरोधी पक्षात बसायला तयार आहे,” असं स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलं आहे.
भाजपसोबत जाण्यास तयार असलेला काँग्रेसमधील गट मोठा असावा, यासाठी संबंधित नगरसेवक वाट पाहत असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे आगामी महापौर निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये मोठी गळती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
