Tiranga Times Maharastra
उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातील हकीमगंज गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे पती कामानिमित्त बाहेर राहत होते, तर पत्नी गावात मुलासोबत राहत होती. काही दिवसांपूर्वी ती पंजाबहून कासगंजमधील गावी परतली होती. 23 डिसेंबरच्या रात्री महिला आणि तिचा प्रियकर भुरा हे दोघे एकत्र बसून दारू पीत होते. त्याचवेळी महिलेच्या अल्पवयीन मुलाने दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले.
हे दृश्य पाहून मुलाचा संयम सुटला आणि रागाच्या भरात त्याने काठीने आईच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात आईचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी मुलगा संपूर्ण रात्र मृतदेहासोबत घरातच राहिला.
पुढील दिवशी सकाळी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. सुरुवातीला मुलाने आईच्या प्रियकरावर हत्येचा आरोप केला. मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर सत्य समोर आले. मृत महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
