Tiranga Times Maharashtra
. बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री आणि वापर खुलेआम सुरू असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
औंध–बाणेर रस्त्यावर कस्तुरबा वसाहतीजवळ कामावरून दुचाकीवरून घरी जात असताना एका तरुणाच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला. वेगात असलेल्या दुचाकीस्वाराच्या हेल्मेटपर्यंत मांजा घुसल्याने गंभीर दुखापत झाली. वेळेत उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला.
याच दरम्यान येरवडा परिसरातही अशाच प्रकारची आणखी एक घटना घडली. रस्त्यावरून प्रवास करत असताना नायलॉन मांजा हाताला अडकल्याने दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. या दोन्ही घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नायलॉन मांजावर कायद्याने बंदी असतानाही त्याची सर्रास विक्री सुरू असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हेल्मेट घातले असतानाही जीवघेण्या जखमा होत असल्याने प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
