Tiranga Times Maharastra
Ward 202, 203 & 204 Uddhav Sena Candidates : परळ-लालबागमध्ये अनिल कोकीळना मोठा धक्का, शिवसैनिकांचा मातोश्रीबाहेर गोंधळ
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत उमेदवारी वाटपामुळे असंतोषाचे चित्र दिसत आहे. परळ-लालबाग परिसरातील वॉर्ड क्रमांक 202, 203 आणि 204 संदर्भात मोठी नाराजी उफाळून आली असून, अनिल कोकीळ यांना यामुळे मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
परळ, लालबाग, परळगाव आणि काळाचौकी हा भाग शिवसेनेच्या स्थापनेपासून बालेकिल्ला मानला जातो. या विभागातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळणं म्हणजे विजय जवळपास निश्चित, असं गणित गेल्या अनेक वर्षांपासून आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही या भागाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वालाच साथ दिली होती.
रविवारी रात्रीपासून उमेदवारांना अधिकृत फॉर्म देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र परळ-लालबागमधील काही वॉर्डांबाबत स्पष्टता नसल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. याच नाराजीचा उद्रेक होत काही शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमल्याची माहिती आहे.
दरम्यान, शिवडी विधानसभा मतदारसंघातील वाद मिटल्याचे संकेत असले तरी परळ-लालबागमधील अंतर्गत नाराजी उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडींमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
