Tiranga Times Maharastra
उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर सातत्याने आरोप केले जात आहेत. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आणि खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे. नुकत्याच tv9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत, “तीच तीच स्क्रिप्ट किती वेळा घासणार? आता तरी स्क्रिप्ट रायटर बदला,” असा टोला लगावला.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून मोठमोठ्या सभा आणि रोड शोचे आयोजन करण्यात येत आहे.
विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर आपलीच सत्ता असावी, अशी प्रत्येक पक्षाची रणनीती आहे. भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) एकत्र येऊन मुंबई महापालिकेची निवडणूक लढवत आहेत.
दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी युती करत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभरातील काही महापालिकांमध्येही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र मैदानात उतरले आहेत. ही युती पहिल्यांदाच झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. राज ठाकरे यांनी तर थेट “मुंबई महापालिकेवर आमचीच सत्ता येणार” असा दावा केला आहे.
या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याने निवडणूक प्रचाराला आणखी धार आली असून, येत्या काही दिवसांत आरोप-प्रत्यारोपांची लढाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
