Tiranga Times Maharashtra
38 वर्षीय शपूरची प्रकृती अत्यंत गंभीर असून तो रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याच्या पांढऱ्या पेशी (WBC) धोकादायक पातळीपर्यंत कमी झाल्या असून त्यामुळे संसर्गाचा धोका प्रचंड वाढला आहे.
एकेकाळी अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजीचा कणा असलेला शपूर जादरान मैदानावर जिद्द, आत्मविश्वास आणि लढाऊ वृत्तीचं प्रतीक मानला जायचा. पण सध्या त्याच्यावर आलेली ही वेळ संपूर्ण क्रिकेटविश्वासाठी वेदनादायक ठरत आहे. रुग्णालयातून समोर आलेल्या छायाचित्रांनी चाहत्यांचं मन हेलावून टाकलं आहे. शपूरची अवस्था पाहून कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत.
या घटनेनंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रशीद लतीफ यानेही सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत शपूरच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे. अफगाणिस्तानसह जगभरातील क्रिकेट चाहते, खेळाडू आणि संघटनांकडून शपूरसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मैदानावर अनेक ऐतिहासिक क्षण देणारा हा योद्धा पुन्हा एकदा आयुष्याची लढाई जिंकावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे.
