Tiranga Times Maharastra
मराठी मनोरंजन विश्वात सध्या सोहम बांदेकर आणि पूजा बरारी यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. झगमगत्या दुनियेत अनेक सेलेब्रिटी विवाह चर्चेत असताना, अभिनेते आणि सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम याने प्रेमविवाह करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतानाच, सोहमने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या प्रेमकथेचा खुलासा केला. विशेष म्हणजे ही लव्हस्टोरी कोणत्याही आलिशान डिनर डेटपासून नाही, तर साध्या चक्का पाणीपुरीपासून सुरू झाल्याचं त्याने सांगितलं.
या मुलाखतीत सोहमने वडील आदेश बांदेकर यांनी दिलेल्या एका सल्ल्याचा उल्लेख केला, जो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “तू मर्द असशील तर तिचा पूर्ण सन्मान ठेव” असं आदेश बांदेकर यांनी लग्नाआधीच मुलाला बजावल्याचं सोहमने सांगितलं. इतकंच नाही, तर पूजा हीच आपल्या घराची सून व्हावी, असा हट्ट खुद्द आदेश बांदेकर यांचा होता, हेही त्याने उघड केलं. त्यामुळे सोहम-पूजा यांच्या नात्याला केवळ प्रेमाचीच नाही, तर कुटुंबाच्या विश्वासाचीही भक्कम साथ मिळाल्याचं स्पष्ट होतं.
