Tiranga Times Maharastra
आज 31 डिसेंबर, वर्षाचा शेवटचा दिवस असून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशनची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी महत्त्वाची दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. वाढत्या गर्दीचा विचार करता मुंबई मेट्रो-1 च्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली असून वर्सोवा-घाटकोपर मार्गावर उशिरापर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध असणार आहे.
नववर्षाच्या जल्लोषात सहभागी होणाऱ्यांना रात्री उशिरा घरी परतताना वाहतुकीची अडचण येऊ नये यासाठी हे नियोजन करण्यात आलं आहे. तसेच 1 जानेवारीपासून रेल्वेचं नवीन वेळापत्रक लागू होणार असून काही एक्सप्रेस गाड्यांच्या वेळा आणि नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी वेळापत्रक तपासण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नियमांचं पालन करावं, मद्यपान करून वाहन चालवू नये आणि सुरक्षित पद्धतीने नववर्षाचं स्वागत करावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
